शीतल महाजन यांचा रात्रीच्या काळोखात ५ हजार फुटांवरून पॅराजम्पिंगचा विक्रम
पुणे | स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष व जागतिक महिला दिनानिमित्त पद्मश्री शीतल महाजन यांनी हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथे रात्रीच्या वेळी पाच हजार फुटांवरून पॅरामोटर्सच्या सहाय्याने पॅराजम्पिंग करून तब्बल सहा वर्षानंतर हा नवा विक्रम नोंदविला. अशाप्रकारे पॅरामोटरमधून पॅराजम्प करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. रात्री सात वाजून पन्नास मिनिटे ते आठ वाजून पंधरा मिनिटांपर्यंत असे सुमारे पंचवीस मिनिटे त्यांनी पॅराजम्पिंग केले.
दीड महिन्यापूर्वी याचठिकाणी पद्मश्री महाजन यांनी नऊवारी साडी नेसून प्रजासत्ताक दिनानिमित्त सहा हजार फुटावरुन जम्पिंगचे रेकॉर्ड केले आहे. त्यांच्या नावावर १८ राष्ट्रीय आणि सहा जागतिक विक्रम नोंद झालेले आहेत. जगातील सात खंडांत स्काय डायव्हिंग करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. त्यांचे पॅराजम्पिंग पाहण्यासाठी अनेक चाहत्यांनी व नागरिकांनी गर्दी करून आनंद घेतला. पॅरामोटरचे पायलट कँप्टन विजय सेठी व ग्लायडिंग सेंटरचे अधिकारी शैलेश चारभे यांनी सहकार्य केले. नोबल हॉस्पिटलने कॉर्डिओ अँम्बुलन्स व्यवस्था केली होती. तर हडपसर पोलिस स्टेशनच्यावतीने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हा विक्रम केल्यानंतर शीतल महाजन म्हणाल्या की, या मोहिमेतील उद्योगपती विजय सेठी हे पॅरामोटर इन्स्ट्रक्टर असून आम्ही जमिनीपासून ५ हजार फुटांवर गेलो. त्यानंतर मी पॅरामोटरमधून बाहेर उडी घेतली आणि तेव्हढ्याच उंचीवरून पॅराशुट उघडले. त्यावेळी खाली दिसलेले दृश्य शब्दांपलीकडील होते. रात्रीचे स्काय डायव्हिंग हा प्रकार अफलातून असून त्याचा एकदा तरी अनुभव घ्यायला पाहिजे असे शीतल महाजन म्हणाल्या.