देशी खाद्यतेलाच्या किंमतीत घसरण; पाम तेलाच्या दरात मात्र तेजी कायम
नवी दिल्ली |रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. कच्च्या तेलाचे दर १२० डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत. कच्च्या तेलाच्या दरांसोबतच खाद्य तेलाचे दरदेखील वाढल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, काल गुरुवारी खाद्यतेलाचे दर काही प्रमाणात घसरल्याचे पाहायला मिळाले. सोयाबीन आणि शेंगदाणा तेलाचे दर काही प्रमाणात कमी झाले. त्यामुळे ग्राहकांसह व्यापाऱ्यांनादेखील दिलासा मिळाला आहे. गुरुवारी दिवसभर तेल मार्केटमध्ये चढ-उतार पाहायला मिळत होता. शेवटी थोड्याशा घसरणीसह मार्केट बंद झाले. मागणी कमी आणि उत्पादन जास्त झाल्याने तेलाचे दर थोडेसे कमी झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
पहिल्यांदाच शेंगदाणा तेलाच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. गुजरातमध्ये शेंगदाणा तेल तब्बल लिटरमागे नऊ रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर इतर तेलांच्या किंमतीतदेखील घसरण झाली. मात्र दुसरीकडे पाम तेलाच्या भावात अद्यापही तेजी कायम आहे. देशात बाहेरून आयात केलेल्या पाम तेलाच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे, तर देशात उत्पादीत होणाऱ्या इतर तेलाचे भाव घसरले आहेत. युद्धामुळे पुरवठा साखळी खंडित झाल्याने पाम तेलाचे दर वधारल्याचे पहायला मिळत आहे