क्रिडा प्रबोधिनी, एक्सलन्स् ऍकॅडमी संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश !
सातवी कै. हुसेन मेमोरियल हॉकी अजिंक्यपद स्पर्धा
पुणे: क्रिडा प्रबोधिनी आणि एक्सलन्स् ऍकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा वेगवेगळ्या शैलीत पराभव करत कै. हुसेन नाबी शेख हॉकी आणि स्पोर्टस् फाऊंडेशन तर्फे आयोजित सातव्या कै. हुसेन हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरूनगर पिंपरी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या पहिल्या उपांत्यपुर्व फेरीत क्रिडा प्रबोधिनी संघाने एसआरपीएफ संघाचा 9-1 असा सहज धुव्वा उडविला. यामध्ये अंकित गौरव यानेदोन तर, तालिब शहा याने तीन गोल करून विजयात मोलाचा वाटा उचलला. वैंकटेश कोवेहे, सतिश पाटील, धर्मेश्वर पोटे व हरीष शिंदे यांनी प्रत्येकी एकेक गोल केले.
दुसऱ्या सामन्यात एक्सलन्स् ऍकॅडमीने हॉकी लव्हर्स संघाचा 12-0 असा एकतर्फी पराभव करून दिमाखात आगेकूच केली. यामध्ये आनंद राई, भूषण ढेरे, अनिकेत मुथय्या, विनीत शेट्टी व सुनिल राठोड यांनी प्रत्येकी एकेक गोल केले. प्रिन्स् चौरसिया व रोमेश पिल्ले यांनी प्रत्येकी दोन तर, युवराज वाल्मिकी याने तीन गोल करून संघाला सोपा विजय मिळवून दिला.
यावेळी 14 वर्षांखालील आंतरशालेय स्पर्धेत सेंट ऊर्सुलाच्या संघाने लॉयला हायस्कूलचा 3-0 असा एकतर्फी पराभव करत आपली आगेकूच सुरू ठेवली. यावेळी सेंऊर्सुलातर्फे जसकरण सिंगने 1 गोल केला तर ओम कुटे याने दोन गोल करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
तर दुसऱ्या सामन्यात पीसीएमसीच्या संघाने सेंट उर्सूलाचा 1-0 असा पराभव करत आगेकूच केली. यावेळी पीसीएमसी कडून गणेश आठवलेने एकमेव गोल केला.