निर्बंध झुगारून ‘खेळ रंगला पैठणीचा’कार्यक्रमाचे आयोजन ; भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल
पिंपरी | प्रतिनिधी
कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शासनाने लोकांच्या एकत्र जमण्यावर बंधने घातली आहेत. शासनाच्या या नियमांकडे कानाडोळा करून प्रभागात ‘खेळ रंगला पैठणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले. याप्रकरणी भाजप नगरसेवकासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 27) पिंपळे गुरव येथे घडला आहे.
नगरसेवक सागर सुनील आंघोळकर आणि प्रतिभा महिला पतसंस्थेच्या उपाध्यक्ष शोभा नवनाथ जांभुळकर यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 188, 269, 270, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ब, साथीचे रोग अधिनियम 1897 चे कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार तुषार साळुंखे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गर्दी करण्यास मनाई केली आहे. तसेच, वेळेचे बंधन घालून दिले आहे. शासनाच्या या नियमांना बगल देत आरोपींनी पिंपळे गुरव येथे ‘खेळ रंगला पैठणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाला प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. त्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन झाले.
पोलीस आयुक्तांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोरोना प्रादुर्भाव होणार नाही, याबाबत दिलेल्या मनाई आदेशाचा आरोपींनी भंग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.