चिंचवडमध्ये पीएमपी बसखाली सापडून महिलेचा मृत्यू
पिंपरी :- रस्त्याने दुचाकीवरून जात असताना अचानक दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने महिला रस्त्यावर पडली. मागून येणाऱ्या पीएमपीएमएल बसखाली सापडल्याने तिचा मृत्यू झाला. ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी साडेनऊच्या सुमारास चिंचवड येथील अहिंसा चौकात घडली.
तस्मिया देसाई (वय 29, रा. बाणेर), असे मयत महिलेचे नाव आहे. देसाई या आज (शुक्रवारी) सकाळी आपल्या चार वर्षाच्या मुलाला पाळणा घरात सोडून परत येत होत्या. यावेळी अहिंसा चौकातून दुचाकीवरून जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्या तोल जाऊन रस्त्यावर पडल्या. दरम्यान मागून येणाऱ्या पीएमपीएमएल बसच्या मागच्या चाकाखाली त्या सापडल्या. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. देसाई यांना तात्काळ उपचारासाठी पिंपरीमधील यशवंतराव चव्हाण स्मृती(वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. देसाई यांचे सासर साता-याचे असून त्यांचे माहेर पन्हाळा येथील आहे. मात्र नोकरीनिमित्त आपल्या पती व मुलासोबत बाणेर येथे वास्तव्यास होत्या. अपघातावेळीच त्यांच्या भावाचा फोन आला होता. यावेळी पोलिसांनी त्याला अपघाताची माहिती दिली.