गादीच्या दुकानाला आग : दोन लाखांचे नुकसान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/firestorm-texture-black-background-shot-flying-fire-sparks_41471-3252.jpg)
पिंपरी | प्रतिनिधी
काळेवाडी येथे गादीच्या दुकानातील कापूस पिंजण्याच्या मशीनला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही आग शेजारी असणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये देखील पसरली. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 16) सायंकाळी पिंपरी-काळेवाडी डीलक्स चौक रोडवर पुलाजवळ असलेल्या गादीच्या दुकानात आग लागली. शॉर्ट सर्किट झाल्याने गादीच्या दुकानातील कापूस पिंजण्याची मशीन सुरुवातीला पेटली. क्षणात आग संपूर्ण दुकानात पसरली.
दुकानातील कापसाला देखील आग लागल्याने धुराचे लोट उडाले. त्यानंतर आग शेजारी असलेल्या कोहिनूर रेस्टॉरंट मध्ये पसरली. आगीमध्ये दोन्ही दुकानांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन केंद्राचा एक आणि रहाटणी उपकेंद्राचा एक असे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळवले.