नाशिक – कसारा एसटीवर दगडफेक, सुदैवाने चालक बचावले, काच फुटली
नाशिक | एसटी महामंडळाच्या नाशिक-कसारा बसवर दगडफेक करत काच फोडल्याची घटना काल शनिवारी सकाळी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्व्हिस रोडवरील उड्डाणपूलावर घडली. या घटनेत एसटीची पुढील काच फुटली असून चालक थोडक्यात बचावला.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इगतपुरी येथील बसचालक संतोष धांडे (५४ ) हे काल शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नाशिक-कसारा बस क्रमांक एम. एच. ४० वाय ५९७३ प्रवासी भरून कसाराच्या दिशेने चालले होते.त्याचवेळी मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्व्हिस रस्त्यालगत मामा का ढाबा हॉटेलजवळ झाडाआड लपलेल्या अज्ञात समाजकंटकाने बसवर दगडफेक केली. यात एसटीची समोरील मोठी काच फुटली. सुदैवाने चालक संतोष धांडे यांनी लगेच बस रस्त्याच्या कडेला घेतल्याने पुढील अनर्थ टळला. चालक धांडे यांच्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुंदर कोकाटे हे करीत आहेत.