सिंधूची विजयी सलामी, श्रीकांतला पराभवाचा धक्का
इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा
जकार्ता: भारताची ऑलिम्पिक रौप्यविजेती खेळाडू पी. व्ही. सिंधूने थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगवर संघर्षपूर्ण विजयाची नोंद करताना येथे सुरू झालेल्या इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीत विजयी सलामी दिली. मात्र भारताचा स्टार खेळाडू आणि गतविजेत्या किदंबी श्रीकांतचे आव्हान पहिल्याच फेरीतील पराभवामुळे धक्कादायकरीत्या संपुष्टात आले.
सिंधूने चोचुवोंगचे आव्हान 21-15, 19-21, 21-13 असे मोडून काढले. परंतु जपानच्या बिगरमानांकित केन्टो मोमोटाने चतुर्थ मानांकित किदंबी श्रीकांतचा 12-21, 21-14, 21-15 असा सनसनाटी पराभव करताना आपल्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. विशेष म्हणजे श्रीकांतने पहिली गेम जिंकल्यानंतर मोमोटाने जोरदार पुनरागमन करून विजयाची नोंद केली. ही लढत एक तास रंगली.
महिला एकेरीत वैष्णवी रेड्डीला, तसेच पुरुष दुहेरीत मनू अत्री व सुमीत रेड्डी या जोडीला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत डेन्मार्कच्या बिगरमानांकित लिने जार्सफेल्डने वैष्णवीचे आव्हान 21-12, 21-10 असे केवळ 27 मिनिटांत मोडून काढताना दुसऱ्या फेरीत धडक मारली. तर पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत चीनच्या झेग सिवेई व हुआंग याक्वियांग या चतुर्थ मानांकित जोडीने मनू अत्री व सुमीत रेड्डी या जोडीवर 21-12, 21-14 अशी केवळ 26 मिनिटांत मात करून आगेकूच केली.
त्याआधी भारताच्या एच. एस. प्रणयने चीनचा महान खेळाडू लिन डॅनवर मात करताना पुरुष एकेरीच्या पहिल्याच फेरीत खळबळजनक निकालाची नोंद केली होती. तसेच अनुभवी खेळाडू सायना नेहवाल आणि समीर वर्मानेही दुसऱ्या फेरीत आगेकूच केली. परंतु युवा खेळाडू साई प्रणीथचे आव्हान सलामीलाच संपुष्टात आले आहे.
महिला दुहेरीत जक्कमपुडी मेघना आणि पूर्विशा राम या भारतीय जोडीला पहिल्याच फेरीत अगाथा इमॅन्युएला आणि सिती फादिया सिल्व्हा या इंडोनेशियन जोडीविरुद्ध 11-21, 18-21 अशी हार पत्करावी लागली. तसेच पुरुष दुहेरीतील पहिल्या फेरीत सात्विकसाईराज रॅंकिरेड्डी व चिराग शेट्टी या बिगरमानांकित भारतीय जोडीला हिरोयुकी एन्डो आणि युता वातानाबे या जपानच्या जोडीकडून 8-21, 15-21 असा पराभव पत्करावा लागला.