वेेंगुर्ला समुद्रात कृष्णा बार्ज बुडाले; 1 मृत, 5 जण बचावले, 4 बेपत्त्ता
सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला रॉक्सच्या उत्तरेला जयगडवरून गोव्याला निघालेले कृष्णा बार्ज समुद्रात बुडालल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 2 डिसेंबरची असून खराब हवामानाचा फटका या बार्जला बसला. कृष्णा बार्ज जेव्हा बुडाले तेव्हा त्यावर 10 क्रू मेंबर होते. बार्ज बुडत असल्याने 10 जणांनी समुद्रात उडी मारली. त्यातील 5 जणांना वाचवण्यात गोवा तटरक्षक दलाला यश आले तर एकाचा मृतदेह मिळाला. लाईफ जॅकेट घातलेले 4 जण अद्याप बेपत्ता आहेत.
जयगड येथून गोव्यासाठी कृष्णा बार्ज निघाले होते. मात्र जोवाड चक्रीवादळाच्या प्रभावामुळे हवामान खराब असल्याने हे बार्ज वेंगुर्ला रॉक्सच्या परिसरात बुडाले. बार्ज बुडत असल्याने गोवा तटरक्षक दलाने तात्काळ शोध आणि बचाव कार्यासाठी आपले चेतक हेलिकॉप्टर आणि तीन जहाजे पाठवली. बार्ज बुडत असताना त्याच्या आजूबाजूला असलेल्या केरळच्या तीन वेगवेगळ्या मासेमारी नौकांनी बार्जमधील तिघांना वाचवले होते. गोवा तटरक्षक दलाचे समुद्रात सर्च ऑपरेशन सुरु आहे. तटरक्षक दलाने वाचवलेल्या 5 जणांना उपचारासाठी गोव्यातील बांबुळी मेडिकल कॉलेज येथे दाखल केले आहे.