मावळ भाजपाला धक्का : आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
- आमदार सुनील शेळके यांची नगरपरिषद निवडणूक मोर्चेबांधणी
- राज्याचे माजी मंत्री बाळा भेगडे यांच्यासह भाजपाला आव्हान
पिंपरी l प्रतिनिधी
मावळमध्ये आमदार सुनील शेळके यांनी कार्यकर्त्यांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपमधून अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. नुकताच लोणावळा नगरपरिषदेतील भाजपचे नगरसेवक, काँग्रेसचे नगरसेवक, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील माजी नगरसेवक तसेच देहूगावचे माजी उपसरपंच आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश सोहळा मुंबई येथे पार पडला.
वाशिम, मावळ आणि ठाणे ग्रामीण भागातील अनेक मान्यवरांनी @NCPspeaks मध्ये जाहीर प्रवेश केला. ठाणे जिल्ह्यातील जि.प. सदस्य सुरेश म्हात्रे, लोणावळ्याचे विद्यमान नगरसेवक भरत हरपुडे आणि हाजी मो. युसुफ पुंजानी यांसह पक्ष प्रवेश केलेल्या अन्य मान्यवरांचं मनःपूर्वक स्वागत आणि शुभेच्छा! pic.twitter.com/2sfjimGi9Z
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 2, 2021
लोणावळा नगरपरिषदेतील भाजपचे विद्यमान नगरसेवक भरत हारपुडे, काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका आरोही तळेगावकर, भाजपचे माजी शहर उपाध्यक्ष गणेश इंगळे, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगरसेवक चंद्रभान खळदे, देहूगावचे माजी उपसरपंच स्वप्नील काळोखे, उद्योजक भरत काळोखे, अमोल काळोखे यांनी त्यांच्या सहकार्यांसह मुंबई प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी, लोणावळा व देहू शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वाभिमानातून स्थापन केलेल्या पक्षाची विचारधारा सामान्य जनतेपुढे पोहोचण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आजचा पक्षप्रवेश प्रभावी ठरेल, असा विश्वास आहे.