महिलेला रस्ता ओलांडण्यासाठी केलेली मदत बेतली जीवावर बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
प्रतिनिधी
एका महिलेला रस्ता ओलांडण्यासाठी मदत करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. महिलेला मदत करत असताना भरधाव वेगात आलेल्या बसने तरुणाला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 30) पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक रोडवर बालाजीनगर, चाकण येथे घडला.
पवन भिवलाल कोळी (वय 23) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सचिन छोटुराम पाटील (वय 21, रा. मेदनकरवाडी, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मित्र मयत पवन हा मंगळवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर एका महिलेला रस्ता ओलांडण्यासाठी मदत करत होता. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या बसने पवनला धडक दिली. बसच्या धडकेत पवन यांच्या छातीला, पायाला गंभीर दुखापत झाली. अपघात घडल्यानंतर आरोपी बस चालक घटनेची माहिती न देता घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या पवनचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.
आदल्या दिवशीही पुणे-नाशिक महामार्गावर अपघात
पवनचा अपघात होण्याच्या 10 तास अगोदर पुणे-नाशिक महामार्गावर तुपेवस्ती मोशी येथे एक अपघात झाला. त्यातही एका तरुणाचा मृत्यू झाला असून एक तरुण जखमी झाला आहे. जखमी तरुणाने याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी टेम्पो चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. संतोष शिंदे असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. हनुमंत बालाजी आगलावे (वय 22, रा. वासोली, चाकण) असे जखमी तरुणाचे नाव आहे.