यंदाची दिवाळी ४ नोव्हेंबरला; चार ग्रह आले ‘या’ एकाच राशीत
अहमदनगर – यंदाची दिवाळी पुढील महिन्यात गुरुवार ४ नोव्हेंबर रोजी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्ष अमावस्येला साजरी केली जाणार आहे. त्यातच यंदाच्या दिवाळीला चार ग्रह एकाच राशीत येण्याचा दुर्मिळ योगायोग आला आहे, अशी माहिती ज्योतिषी डॉ.अरविंद मिश्रा यांनी दिली आहे. चार ग्रहांच्या एकत्र येण्याने ही दिवाळी शुभ असणार असल्याचेही मिश्रा यांनी सांगितले आहे.
यंदा ४ नोव्हेंबरला कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाची अमावस्या आहे. यादिवशी सूर्य, मंगळ, बुध आणि चंद्र हे चार ग्रह तूळ राशीत असणार आहेत. यालाच शुभ योग मानला जात आहे. यातील सूर्याला ग्रहांचा राजा,मंगळाला सेनापती आणि बुध ग्रहाला राजकुमार म्हटले जाते. तर चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. तसेच सूर्य हा पिता आणि चंद्र आईचा कारक म्हटले जाते. दिवाळी ४ नोव्हेंबरला सकाळी ६.०३ वाजता अमावस्या सुरू होते तर ५ नोव्हेंबर रोजी २.४४ वाजेपर्यंत अमावस्या संपते.यंदा दिवाळी लक्ष्मीपूजन मुहूर्त संध्याकाळी ६.०९ ते रात्री ८.२० पर्यंत असून हा कालावधी १ तास ५५ मिनिटांचा असल्याचे डॉ.अरविंद मिश्रा यांनी सांगितले आहे.