मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात बदल, सकाळी ६.३० वाजता पहिली मेट्रो
मुंबई – वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो-१ च्या वेळापत्रकात आजपासून बदल करण्यात आला आहे. या नवीन वेळापत्रकानुसार घाटकोपर येथून सकाळी ६.३० वाजता पहिली, तर शेवटची मेट्रो रात्री १०.५५ वाजता सुटणार आहे. यापूर्वी सकाळी ७.१५ वाजता पहिली मेट्रो आणि १०.१५ वाजता शेवटची मेट्रो सुटत होती. या नवीन वेळापत्रकात वेळा व फेऱ्या वाढवल्याने मुंबईकर प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
मुंबई मेट्रोतून सुरुवातीला कमी प्रमाणात प्रवासी प्रवास करत होते. मात्र आता प्रवाशांची संख्या वाढली आहे. दिवसाला सुमारे दीड लाख प्रवासी प्रवास करत आहेत. त्यामुळे मेट्रोने वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला होता. या नव्या वेळापत्रकानुसार घाटकोपर आणि वर्सोवा येथून सकाळी ६.३० वाजता पहिली मेट्रो सुटणार आहे. तर वर्सोवा येथून शेवटची मेट्रो १०३० वाजता आणि घाटकोपर येथून १०.५५ वाजता सुटणार आहे. यापूर्वी अनुक्रमे ९.५० आणि १०.१५ वाजता या मेट्रो सुटत होत्या.