काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांच्या ३ घटनांमध्ये एक नागरिक ठार
श्रीनगर |
श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार करण्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये शनिवारी १ नागरिक ठार, तर दुसरा जखमी झाला. दहशतवाद्यांनी अनंतनाग जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) बंकरवर ग्रेनेडही फेकला, मात्र या स्फोटात काही नुकसान झाले नाही, असे पोलिसांनी सांगितले.
सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास घडलेल्या पहिल्या घटनेत, दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या छटबल भागातील रहिवासी माजिद अहमद याच्यावर करण नगर येथे गोळीबार केला. यात गंभीर जखमी झालेला माजिद नंतर रुग्णालयात मरण पावला. रात्री ८ वाजताच्या सुमारास दहशतवाद्यांनी बाटामालू येथील मोहम्मद शफी दार याच्यावर गोळ्या झाडल्या. दार याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी ४० बटालियन सीआरपीएफच्या के.पी. रोड येथील बंकरवर सायंकाळी पावणेसातच्या सुमारास हातबॉम्ब फेकला. मात्र लक्ष्य चुकल्यामुळे कोणतीही हानी झाली नाही.