धक्कादायक! टॉवेलने गळा आवळून भाजपा नेत्याची हत्या; पोलीस घटनास्थळी दाखल
नवी दिल्ली |
भाजपा नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मंत्री आत्माराम तोमर यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशात बागपत येथील निवासस्थानी आत्माराम तोमर यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. आत्माराम तोमर यांची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. पोलीस सध्या याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्माराम तोमर यांचा चालक सकाळी निवासस्थानी पोहोचला होता. यावेळी दरवाजा बंद होता. त्याने वारंवार दरवाजा ठोठावूनही दरवाजा उघडला नाही तेव्हा दरवाजा तोडण्यात आला. यावेळी आत्माराम तोमर यांचा मृतदेह जमिनीवर होता. त्यांच्या गळ्याभोवती टॉवेल गुंडाळलेला होता.
उत्तर प्रदेश पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. प्राथमिकदृष्ट्या आत्माराम तोमर यांची टॉवेलच्या सहाय्याने गळा दाबून हत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. तोमर यांच्या चालकाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची स्कॉर्पिओदेखील निवास्थानावरुन बेपत्ता आहे. पोलिसांना या प्रकरणात काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय आहे. पोलिसांनी तोमर यांच्या कुटुंबाला कळवलं असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. आत्माराम तोमर हे भाजपाचे वरिष्ठ नेते होते. १९९३ मध्ये आत्माराम तोमर यांनी भाजपाच्या तिकीतावर चारुपल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यानंतर १९९७ मध्ये त्यांनी सरकारमध्ये मंत्रीपद देण्यात आलं होतं.




