रोजगार क्षेत्रात सुधारणा! जूनमध्ये ईपीएफओचे १२.८३ लाख नवे सदस्य
![Employment reforms! 12.83 lakh new EPFO members in June](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/69389133-1.jpg)
नवी दिल्ली- कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. उद्योगधंदे बंद पडले होते. परंतु आता त्यात झपाट्याने सुधारणा होत असल्याचे ईपीएफओने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटनेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार जूनमध्ये १२ लाख ८३ हजार नव्या कामगार सदस्यांची नोंद झाली आहे. मेमध्ये ५ लाख ९ हजार नव्या सदस्यांची नोंद झाली होती. मात्र जूनमध्ये प्रथमच ८ लाख ११ हजार नवे कामगार सदस्य संघटनेशी जोडले गेले आहेत. त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे, असे ईपीएफओने म्हटले आहे.
श्रम मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निधी संघटनेतील नवीन सदस्यांची जून महिन्यातील आकडेवारी जाहीर केली आहे. जूनमध्ये १२ लाख ८३ हजार नवे कामगार सदस्य बनले आहेत. मेमध्ये ही संख्या ५ लाख ९ हजार होती. म्हणजे त्यात ८ लाख ११ हजारांची वाढ झाली आहे. महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटक ही राज्ये त्यात आघाडीवर असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. जूनमधील आकडेवारीत या ५ राज्यांमधील ७ लाख ७८ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जून महिन्यात २ लाख ५६ हजार नव्या महिला कर्मचाऱ्यांची नोंद झाली आहे. मेमध्ये ९७ हजार नवे महिला कर्मचारी होते. यात १८ ते २५ वर्षे वयोगटातील ६ लाखांपेक्षा अधिक आणि २ लाख ५५ हजार २९ ते ३५ वर्षे वयोगटातील कामगार आहेत, असे ईपीएफओने म्हटले आहे.