सोलापूर जिल्ह्यातील ५ तालुक्यात शुक्रवारपासून कडक निर्बंध लागू
सोलापूर – सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी आता प्रशासनाने ५ तालुक्यात शुक्रवार १३ ऑगस्टपासून पुढील आदेश येईपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्ह्या प्रशासनाने हे नवे आदेश लागू केले आहेत. या तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे.पुणे कोरोना निर्बंधांबाबतच्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनीही या तालुक्यांचा उल्लेख करत कोरोना वाढीबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने काल रविवारी रात्री हा आदेश काढला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माढा, माळशिरस, करमाळा, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यात १३ ऑगस्टपासून अत्यावश्यक सेवांची दुकाने दुपारी ४ पर्यंतच सुरु राहणार आहेत.अत्यावश्यक सेवांमध्ये नसलेली दुकाने पूर्णपणे बंद असतील.तसेच मेळावे,राजकीय,सामाजिक कार्यक्रमांवर बंदी असेल. विवाह सोहळ्यास ५०ऐवजी २५ लोकांना अनुमतीअसेल. अत्यावश्यक,वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्वांसाठी पाच तालुक्यात संचारबंदी लागू राहील.खासगी आणि सार्वजनिक, प्रवासी वाहतूक तसेच माल वाहतुक सुरू राहणार आहे.