जीव जाईपर्यंत बापाने चिमुरडीला जमिनीवर आपटलं, पोलीसही चक्रावले; आरोपी बापाला अटक
मुंबई |
राग आणि भांडणात माणूस काय करेल, याचा नेम नसतो. रागाच्या भरात तो एखाद्याचा जीवही घेऊ शकतो. रागामुळे किंवा भांडणातून हत्या केल्याच्या, मारहाणीच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या बिजनौर जिल्ह्यात समोर आली आहे. राहतपूर खुर्द गावात एका व्यक्तीनं पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर आपल्या आठ महिन्याच्या मुलीला जमिनीवर आपटून हत्या केली आहे. कळस म्हणजे जोपर्यंत मुलीचा जीव गेला नाही, तोपर्यंत तो तिला जमिनीवर आपटत राहिला. पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद नझीम असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी मोहम्मद नझीम आणि महताब जहाँ यांचा दीड वर्षांपूर्वी विवाह झाला होता आणि त्यांना आठ महिन्यांची मुलगी होती. या दाम्पत्यात सतत भांडणं व्हायची. एकेदिवशी दोघांमध्ये जोरदार भांडण झालं आणि महताब जहाँ रागात माहेरी निघून गेली. त्यानंतर ३१ जुलैच्या रात्री आरोपी नझीम दारूच्या नशेत महताबच्या माहेरी गेला. त्याने सासरच्या मंडळींना महताबला सोबत पाठवण्याची मागणी केली. पण महताबने येण्यास नकार दिला आणि पुन्हा त्या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. संतापलेल्या नझीमने अचानक आपल्या आठ महिन्याच्या मुलीला उचलले आणि तिला वारंवार जमिनीवर आपटले. त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर महताबने तिला खासगी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी चिमुरडीला मृत घोषित केले. या घटनेनंतर महताबने तिच्या पतीविरोधात पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी १ ऑगस्टला आरोपी नझीमला अटक केली आणि पोलीस कोठडीत त्याची रवानगी केली.





