लसीकरण मोहिमेत नियोजन नसल्याच्या नगरसेवकांच्या तक्रारी
- दररोज 50 ते 100 डोसचे टोकन देण्याची मागणी
पिंपरी |
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचे नियोजन योग्य नाही. नागरिक नगरसेवकांकडे येतात. नगरसेवकांना नागरिकांच्या समस्या सोडवाव्या लागतात. अशा तक्रारींचा पाढा नगरसेवकांनी वाचला . प्रत्येक नगरसेवकांना दररोज 50 ते 100 डोसेसचे टोकन द्यावेत, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.
महापालिकेच्या ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयात महापौर उषा ढोरे यांनी सर्व विभागांचे अधिका-यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीत नगरसेवकांनी डोससचे टोकन देण्याची मागणी केली. उपमहापौर हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, प्रभाग अध्यक्ष विकास डोळस, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, नगरसदस्य सागर गवळी, नगरसदस्या भिमाताई फुगे, निर्मला गायकवाड, प्रियंका बारसे, सोनाली गव्हाणे, विनया तापकीर, सुवर्णा बुर्डे, क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार, डॉ. शिवाजी ढगे, उपअभियंता मनिष चव्हाण, लता बाबर, प्रेरणा सिनकर, संदेश खडतरे, विजय वाईकर, प्रशासन अधिकारी नाना मोरे, राजेश वाघ, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
बैठकीत प्राप्त सूचना आणि विषयांबाबत महापौर ढोरे यांनी संबंधित अधिका-यांकडून आढावा घेतला. महापौर ढोरे म्हणाल्या, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले असेल तरच शहराच्या विकासाचा उपयोग आहे. याकरिता वैद्यकीय विभागाने लसीकरण मोहिम राबविताना दक्षता घ्यावी व सर्वांना लस मिळावी यासाठी सुयोग्य नियोजन करावे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे. त्याला प्राथमिकता देणेत यावी. यासाठी सर्वांचे लसीकरण करुन घ्यावे. वैद्यकीय विभागाने लसीकरण मोहिमेत सुरळितपणा आणण्यासाठी प्रयत्न करावेत. स्थानिक नागरिकांना लसीकरण करण्याबाबत प्राधान्य देण्यात यावे. लोकप्रतिनिधींच्या प्रश्नाबाबत सर्व संबंधितांनी कृती आराखडा तयार करावा.
अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी विकासकामे लवकर होण्याच्या दृष्टीने संबंधितानी प्रस्ताव सादर करावेत. सदस्यांना त्यांनी उपस्थित केलेल्या कामाबाबत वेळोवेळी परिस्थिती नमूद करावी. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनात समन्वय ठेऊन लोकप्रतिनिधींचे प्रश्न सोडवावेत असे सांगितले.