‘पंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही’ देवेंद्र फडणवीस
मुंबई: माझा नेता नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत, असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी थेट मोदी-शाहांचं नाव घेऊन राज्यातील नेत्यांना डावलल्याची खास करुन देवेंद्र फडणवीसांवर अप्रत्यक्ष निशाणा साधल्याची चर्चा होती. आता पंकजा मुंडे यांच्या याच भाषणावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी भाषण केलं, तुम्ही ते भाषण ऐकलं का? असा प्रश्न पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना, ‘पंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही’, असं म्हणत फडणवीसांनीही पंकजांना त्यांच्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आहे.
“पंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही. आमचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पंकजा ताईंच्या भाषणावर खुलासा केला आहे. त्यांच्या अनेक मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर खुलासे केले आहेत. त्यावर मी बोलण्यात अर्थ नाही”, असं म्हणत ‘पंकजा’ या विषयावर फडणवीसांनी अधिक बोलणं टाळलं.