बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या अडचणीत वाढ; ईडीनं बजावला नव्यानं समन्स
पुणे – पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले आणि त्यांचे कुटुंबीय गेल्या काही महिन्यांपासून ईडीच्या रडारवर आहेत. अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीने छापा मारला होता. काही दिवसांपुर्वी फेमा कायद्याअंतर्गत ईडीने भोसले यांची पुणे आणि नागपुरातील 40 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. परदेशात मालमत्ता खरेदी प्रकरणी त्यांच्यासह पत्नी गौरी भोसले यांची कसून चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर आता अविनाश भोसले यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मालमत्ता जप्तीची कारवाई केल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने व्यावसायिक अविनाश भोसले व त्यांचा मुलगा अमित भोसले यांना नव्यानं समन्स बजावले आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात ही चौकशी करण्यात येणार आहे. अविनाश भोसले यांची आज चौकशी होणार आहे. तर मुलगा अमित भोसले यांची उद्या शुक्रवारी चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना नव्यानं समन्स बजावण्यात आलं आहे.
एबीआयएल या रिअल इस्टेट कंपनीने नोकरशहांच्या घरांच्या बांधकामासाठी राखीव असलेला जमिनीचा भूखंड खरेदी केला. त्यावर व्यावसायिक इमारत बांधून त्याची विक्री केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. त्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणात आता ईडीने उडी मारली असून आता ईडीने या प्रकरणी देखील चौकशी चालू केली आहे.
दरम्यान, अविनाश भोसले यांची मुलगी स्वप्नाली कदम यांनाही ईडीने नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली होती. स्वप्नाली कदम या काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि कृषि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नी आहेत. अद्याप तरी त्यांनी या नोटीसवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसल्याचं सांगितलं जात आहे.





