घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने, साड्या असे 1 लाख 35 हजारांचे साहित्य पळवले
पिंपरी चिंचवड | अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने, साड्या आणि अन्य साहित्य असा एक लाख 35 हजारांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार रविवारी (दि. 27) सायंकाळी किवळे, देहूरोड येथे उघडकीस आला.
आकाश विठ्ठल भांगरे (वय 29, रा. भिमाशंकर नगर, किवळे, देहूरोड) यांनी याबाबत सोमवारी (दि. 28) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 जून ते 27 जून या कालावधीत फिर्यादी यांचे घर कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले 45 हजारांचे दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने, 45 हजारांचे दीड तोळ्याचे सोन्याचे नेकलेस, पंधरा हजारांची अर्धा तोळ्याची सोन्याची नथनी, 15 हजारांची अर्ध्या तोळ्याची कानातील फुले, नऊ हजार रुपयांच्या तीन ग्रॅम सोन्याच्या रिंगा, तीन हजार रुपये किमतीचे दोन पायातील जोडवे व गणपतीचा चांदीचा मुकुट, तीन हजार रुपये किमतीचे दोन बॅल्केट व 22 साड्या असा एकूण 1 लाख 35 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.