शिर्डी संस्थानच्या विश्वस्त मंडळांच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांची नियुक्ती
![NCP MLA Ashutosh Kale appointed as Chairman of Shirdi Sansthan Board of Trustees](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/images-4.jpeg)
शिर्डी – शिर्डी संस्थानच्या विश्वस्त मंडळांच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांची निवड करण्यात आले आहे. साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दोन आठवड्यांची मुदत दिली होती. या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष कोण असणार यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरु होती.
निवड झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे म्हणाले, शिर्डी येथील साई संस्थानचे अध्यक्षपद मिळाल्यामुळे आनंद होत आहे. आत्तापर्यंतचा इतिहास पाहिला तर या जागेवर अनेक ज्येष्ठ नेत्यांना संधी मिळाली होती. परंतु पहिल्यांदाच आता तरुण नेतृत्वाकडे अध्यक्षपदाचं नेतृत्व देण्यात आलं आहे. या आगोदर अध्यक्षपद नेहमी काँग्रेसच्या वाटेला असायचे. परंतु यंदा मात्र काही बदल करण्यात आले आहेत. यंदा शिर्डी संस्थांनचे अध्यक्षपद राष्ट्रवादीला तर पंढरपूर देवस्थानचे अध्यक्षपद काँग्रेसला देण्यात आले आहे. मागील काही दिवसांत ज्या काही घडामोडी शिर्डीमध्ये घडल्या आहेत. यामध्ये लक्ष घालणार आहे. मागील काही दिवसांपूर्वी पत्रकारांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यासोबत अनेक कडक नियम देखील घालण्यात आले आहेत. याबाबतीत पुढाकार घेऊन मी देवस्थान ट्रस्ट आणि पत्रकार यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न करणार आहे.