#PCMCPolice: ‘वडगाव मावळ’, ‘कामशेत’, ‘लोनावळा शहर’, ‘लोनावळा ग्रामीण’ आता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात समाविष्ट?
पुणे |
वेगाने विकसित होत असलेल्या आणि गुन्हेगारीने ग्रासलेल्या पिंपरी-चिंचवडमधील कायदा सुव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्यात आले. सध्या या पोलीस आयुक्तालयामध्ये 15 पोलीस स्टेशनचा समावेश आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये वडगाव मावळ, कामशेत, लोनावळा शहर, लोनावळा ग्रामीण या पोलीस स्टेशनचा समावेश करण्यात यावा असा प्रस्ताव पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावावर पोलीस महासंचालकांनी संबंधितांकडून तात्काळ अभिप्राय मागवला आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी प्रस्ताव सादर केला आहे. पोलीस महासंचालकांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना संबंधित पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ग्रामपंचायतीकडून या संदर्भात अभिप्राय घेण्यास सांगितले आहे. तसेच ग्रामसभेतील ठराव व त्यावरील ग्रामसभेचा निर्णय संबंधीत ग्रामपंचायतीकडून प्राप्त करुन कार्यालयास त्वरीत सादर करावा, असे निर्देश दिले आहेत.सध्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये पिंपरी, चिंचवड, निगडी, सांगवी, वाकड, भोसरी, भोसरी एमआयडीसी, चिखली तसेच पुणे ग्रामीणमधील चाकण, आळंदी, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, देहुरोड या पोलीस ठाण्याचा समावेश करण्यात आला आहे. वडगाव मावळ, कामशेत, लोनावळा शहर, लोनावळा ग्रामीण या पोलीस स्टेशनचा समावेश झाल्यानंतर आयुक्तालयाचा विस्तार होणार आहे.