ठाण्यात सराफाच्या दुकानात मोठा दरोडा, दोन कोटींचे दागिने लंपास
ठाणे – ठाण्यातील शिवाई नगर परिसरातील वारीमाता गोल्ड नावाच्या ज्वेलर्सच्या दुकानात रात्री 2 ते 2:30 च्या सुमारास घरफोडी झाली, त्या मध्ये अंदाजे 3 किलो पर्यंत सोने चोरीला गेल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
यामध्ये चोराने मोठ्या कल्पकतेने ही चोरी केली आहे, परराज्यातील एका व्यक्तीने ह्या ज्वेलर्सच्या दुकानाच्या बाजूचे दुकान दोनच महिन्यापूर्वी भाड्याने घेतले. 28 हजार रुपये भाडे मिळते म्हणून पाटील नावाच्या दुकान मालकाने काहीही चौकशी न करता हे अनोळखी माणसाला भाड्याने दिले. आपला फळांचा व्यवसाय असून त्या करता हा गाळा हवा आहे असे त्याने सांगितले होते. दोन महिने दिखाव्यासाठी त्यांनी फळ विकण्याचा बनाव केला आणि काल रात्री दोन्ही दुकानामधील भिंतीला छोटेसे भगदाड पाडून आत प्रवेश केला व सर्व सोन्याचे दागिने चोरून नेले. सदर घटनेचा वर्तकनगर पोलीस पुढील तपास करत आहेत.