राष्ट्रवादीचे आमदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट
बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. नवी दिल्लीत राष्ट्रीय महामार्गाबाबतच्या कामासंदर्भात क्षीरसागर यांनी गडकरी यांची भेट घेतली. खुद्द शरद पवार यांनी क्षीरसागर यांना गडकरींना भेटण्यासाठी त्यांची वेळ घेऊन दिली होती.
बीड विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांच्या संदर्भाने आमदार संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यावेळी बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाबाबतचा विषय निघताच पवारांनी तातडीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची वेळ घेऊन त्यांना भेटण्याचं क्षीरसागरांना सुचवलं. त्यानुसार आज ही भेट घेतल्याचं आमदार क्षीरसागर यांनी सांगितलं.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज सकाळी भेट घेऊन बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग NH-52 कोल्हारवाडी- बार्शीनाका- छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिरेवाडी या 12 किलोमीटर मार्गाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्याबाबत तसेच शहरालगतच्या बायपासवरील स्लिप रोड व सर्व्हिस रोडच्या संदर्भाने सविस्तर निवेदन सादर करुन याबाबत तातडीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी केल्याचं क्षीरसागर यांनी सांगितलं.





