ब्राझिलसमोर आज स्वित्झर्लंडचे तगडे आव्हान : फिफा विश्वचषक

सोची – एक फुटबॉलवेडा देश म्हणून ब्राझिलच्या संघाची ओळख आहे, या संघाने आतापर्यंत 5 विश्वचषक आपल्या नावे केलेले आहेत, तसेच कोपा अमेरिकासारख्या स्पर्धेत देखील त्यांनी वर्चस्व राखले आहे. अशा या ब्राझिलच्या फिफा विश्वचषक स्पर्धेतील सफरीचा पहिला सामना आज (रविवार) कोणत्याही क्षणी बाजी पालटू शकणाऱ्या स्वित्झर्लंडसारख्या तगड्या संघाविरुद्ध रंगणार आहे. विश्वचषकासाठी ब्राझिलचा समावेश गट ई मध्ये केलेला असून या गटात त्यांच्या सोबत स्वित्झर्लंड, कोस्टा रिका आणि सर्बियाचा समावेश आहे.
या स्पर्धेत पाच वेळा अजिंक्यपद मिळविणारा ब्राझिल संघ 2014 मध्ये पुन्हा विजेता होईल अशी अपेक्षा होती. मात्र उपान्त्य फेरीत जर्मनीने ब्राझीलचा 7-1 असा एकतर्फी पराभव केला होता. या पराभवामुळे खचून न जाता ब्राझिलच्या संघाची पुनर्रचना करण्यात आली आहे. टिटे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्राझिलच्या खेळाडूंनी भरपूर सराव केला आहे. खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यावर टिटे यांनी भर दिला आहे.
डॅनी आल्वेस हा महत्त्वाचा खेळाडू दुखापतीमुळे खेळू शकणार नसला, तरीही नेमारच्या पुनरागमनामुळे ब्राझिलची बाजू बळकट झाली आहे. नुकत्याच झालेल्या सराव सामन्यांमध्ये ब्राझिलने क्रोएशिया व ऑस्ट्रिया यांच्यावर मात केली आहे. मॅंचेस्टर सिटी संघाकडून खेळणारा ब्राझिलचा गॅब्रिएल जेसूस याने या मोसमात 21 सामन्यांमध्ये 17 गोल केले आहेत त्यामुळे संघाला केवळ एकाच खेळाडूवर अवलंबून रहावे लागणार नसल्याने चाहत्यांमध्ये उत्साह आहे.
दुसरीकडे स्वित्झर्लंडचा संघ फिफा विश्वक्रमवारीत सहाव्या क्रमांकावर आहे. या संघाने आतापर्यंत एकदाही विश्वचषक जिंकला नसून तीन वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ब्राझिल, कोस्टा रिका आणि सर्बिया यांच्यासारख्या तुल्यबळ संघांचा सामना स्वित्झर्लंडला करावा लागणार आहे. प्रशिक्षक व्लॅदीमिर पेटकोव्हिक यांना युवा खेळाडूंना आक्रमण आणि बचाव या आघाडीवर अव्वल खेळासाठी मार्गदर्शन करावे लागणार आहे. या संघाचा खेळ पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या या संघाकडून अपेक्षा करणे वावगे ठरणार नाही. ग्रॅनिटी झाका, ब्लेरिम डीजेमैली, स्टीफन लिचस्टरनर आणि फॅबियन स्कर हे आघाडीचे खेळाडू त्यांच्याकडे आहेत.
दरम्यान रशियात होणाऱ्या या स्पर्धेत आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करण्याचे आव्हान ब्राझिलला पेलावे लागेल. त्यांच्या खेळातील सौंदर्य आणि कौशल्य याची भुरळ आजही फुटबॉलप्रेमींच्या मनात आहे. त्यामुळे जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांमध्ये त्यांचाही क्रमांक येतोच. त्यांनी पाच विश्वचषक, सात कोपा अमेरिका चषक आणि चार कॉन्फडरेशन चषक जिंकलेले आहेत.
ब्राझिलच्या संघातील प्रमुख खेळाडू : फुटबॉलपटूंची खाण असलेल्या या संघात अनेक खेळाडूंवर नजरा खिळल्या आहेत. मात्र, गॅब्रिएल जीझससारखे नवीन खेळाडू पहिल्याच महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेला कसे सामोरे जातात याची उत्सुकता लागलेली आहे. नेमार हे त्यांचा प्रमुख अस्त्र असले तरी त्याची दुखापत कधीही डोके वर काढू शकते. त्यामुळे स्पर्धेत त्यांना दडपणाखालीच खेळावे लागणार आहे.
स्वित्झर्लंडच्या संघातील प्रमुख खेळाडू : ब्रिल एम्बोलो या 20 वर्षीय खेळाडूने अल्पावधीतच सर्वाचे मन जिंकले आहे. तंदुरुस्त आणि तांत्रिकदृष्टया सक्षम असलेला हा खेळाडू स्वित्झर्लंडसाठी हुकमी एक्का ठरू शकतो.
ब्राझिल (विश्वक्रमवारीत क्रमांक 2)
नेमार, गॅब्रिएल जेसूस, मार्सेलो, फिलिप लुईस
स्वित्झर्लंड (विश्वक्रमवारीत क्रमांक 6)
ब्रायल एम्बोलो, स्टिफन लिचस्टेनर, हॅरिस सोफोव्होरिक, जोसिप ड्रॅमिक





