#Covid-19: शहरात कोरोनाच्या साडेचार लाख चाचण्या पूर्ण
पिंपरी: कोरोना विषाणू संसर्गाचे निदान करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने चार लाख 29 हजार 693 जणांच्या चाचण्या केलेल्या आहेत. त्यामध्ये 99 हजार 515 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर, तीन लाख 26 हजार 879 जणांचे अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत. कोरोना चाचण्यांचे वाढवलेले प्रमाण ही कोरोना लढ्यातील सर्वांत महत्वाची बाब असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी सांगितले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता.
कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. त्यावेळी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे कोरोना चाचण्या केल्या जात होत्या. त्यामुळे अहवाल येण्यास देखील विलंब होत होता. तर दुसरीकडे कोरोनाचा प्रसार वाढत होता. प्रादुर्भावचा धोका वाढत असल्याने पालिकेने भोसरीतील नारी संस्थेतही चाचण्या सुरु केल्या आहेत. महापालिकेने वायसीएम रुग्णालयात देखील प्रयोगशाळा सुरु केली. खासगी प्रयोगशाळांनाही चाचण्या करण्याची परवानी दिली. त्यामुळे चाचण्यांचे प्रमाण वाढले. अर्ध्या तासात चाचणी अहवाल देणा-या रॅपिड अँटिजेन चाचण्याही केल्या. कोरोनाचे निदान होण्यासाठी त्याचाही मोठा उपयोग झाला. आजपर्यंत चार लाख 29 हजार 693 जणांच्या चाचण्या केल्या आहेत. त्यामध्ये 99 हजार 515 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात शहराबाहेरील रुग्णांचा समावेश आहे. तर, तीन लाख 26 हजार 879 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.