पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांना पुण्यात भारतीय नागरिकत्वांची शपथ

पुणे |महाईन्यूज|
‘लाँग टर्म व्हिसा’वर पुण्यात राहणा-या 18 पाकिस्तानी आणि एका बांगलादेशी नागरिकाला गुरुवार (दि.22) रोजी भारतीय नागरिकत्वाची शपथ दिली. त्यामुळे या नागरिकांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न साकार झाले आहे. कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून या सुनावण्या प्रलंबित होत्या.
याबाबत जिल्हाधिकारी देशमुख यांनी सांगितले की, भारतात लाँग टर्म व्हिसावर राहणा-या पाकिस्तानी, बांगलादेशी नागरिकांना सर्व प्रक्रिया पूर्ण करून भारतीय नागरिकत्व दिले जाते. यात भारतीय नागरिकत्व देण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची छाननी करण्यात आली. गुप्तचर विभागाकडूनही (आयबी) तपासणी करण्यात आली. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर 18 पाकिस्तानी व एक बंगलादेशी व्यक्तीला भारतीय नागरिकत्त्व देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यांना भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र दिले गेले. प्रमाणपत्र हाती पडल्यानंतर या नागरिकांच्या आनंदाला पारावर उरला नाही.
आम्ही गेल्या काही वर्षांपासून पुण्यात राहत आहोत, पण पाकिस्तानचे नागरिकत्व असल्याने आम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. प्रत्येक वेळी पासपोर्ट, व्हिसाचे नूतनीकरण करणे आणि अन्य सरकारी सोपस्कार पार पाडावे लागत होते. आता या सर्व त्रासातून कायमची सुटका झाली असल्याची भावना व्यक्त केली.





