राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना तिसऱ्यांदा मुदतवाढ
पुणे – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रलंबित असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य सरकारने याबाबतचे आदेश काढले असल्याने निवडणुका प्रलंबित असलेल्या सुमारे ४७ हजार २७५ सहकारी संस्थांचे विद्यमान कार्यकारी मंडळ हे कार्यरत राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यापूर्वी सहकारी संस्थांच्या निवडणुकांना दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली. यापूर्वी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढविण्यात आली. ही मुदत संपण्यापूर्वीच राज्य सरकारने निवडणुकांसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता ३१ डिसेंबरपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. मात्र सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिलेल्या सहकारी संस्था यामधून वगळण्यात आल्या असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यात सुधारणा करण्यात आली असल्याने निवडणुका होईपर्यंत सहकारी संस्थांचे विद्यमान संचालक मंडळ कार्यरत राहू शकणार आहे. सध्या राज्यातील ४७ हजार २७५ सहकारी संस्थांच्या निवडणूका प्रलंबित असून या संस्थांच्या संचालकांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली असल्याचे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.