राधानगरीचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले
कोल्हापूर – जिल्ह्यातील गेल्या २४ तासांत बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत सहा धरणक्षेत्रात जोरदार अतिवृष्टी झाली. यामुळे राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे आज बुधवारी (दि.२३) रोजी सकाळी खुले करण्यात आले आहेत.
जोरदार पावसामुळे कडवी वगळता सर्व धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. तर सकाळपासून मात्र या भागात पावसाचा जोर जरा कमी झाला आहे. राधानगरी धरण परिसरात पावसाचा जोर वाढलाय. धरण परिसरात गेल्या २४ तासात ६५ मिली मीटर पावसाची नोंद आहे. मध्यरात्री झालेल्या पावसामुळे राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे पहाटे उघडले.
सहा क्रमांकाचा दरवाजा पहाटे तीन वाजून १० मिनिटांनी तर तीन क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा पहाटे चार वाजून ५५ मिनिटाला उघडला. या दोन्ही दरवाजासह धरणातून मिळून ४२५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दोन्ही स्वयंचलित दरवाजातून २८२८क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.
नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे असे आवाहन विभागाने केले आहे. दरम्यान यंदा राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे चौथ्यांदा उघडले आहेत. आज सकाळपासून कोल्हापूर शहरासह संपूर्ण ग्रामीण भागात ढगाळ वातावरण आहे.