Breaking-newsक्रिडा

अफगाणिस्तानचा बांगला देशला व्हाईट वॉश

तिसऱ्या सामन्यासह मालिकेत 3-0 ने विजय 

डेहराडून – बांगला देशला अखेरच्या षटकांत विजयासाठी केवळ 9 धावांची गरज असताना अव्वल फिरकी गोलंदाज रशीद खानने अखेरच्या षटकांत केवळ 7 धावा देत अफलातून कामगिरी बजावल्यामुळे अफगाणिस्तानला येथे पार पडलेल्या तिसऱ्या टी-20 क्रिकेट सामन्यात अखेरच्या चेंडूवर 1 धावेने विजय मिळविता आला. या विजयामुळे अफगाणिस्तानने बांगला देशवर 3-0 अशा “व्हाईट वॉश’ची नामुष्की लादली आहे.

विजयासाठी 146 धावांच्या आव्हानासमोर तमिम इक्‍बाल (5), सौम्य सरकार (15), लिट्टन दास (12) व शकिब अल हसन (10) फारसा प्रतिकार न करता परतल्याने बांगला देशची 4 बाद 53 अशी घसरगुंडी झाली होती. परंतु मुश्‍फिकुर रहीमने महमुदुल्लाहच्या साथीत केवळ 10.4 षटकांत 84 धावांची भागीदारी करीत बांगला देशला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले होते. या भागीदारीमुळे बांगला देशने 19 षटकांत 4 बाद 137 धावांची मजल मारली होती.

या वेळी मुश्‍फिकुर रहीम 37 चेंडूंत 7 चौकारांसह 46 धावा करून खेळत होता. परंतु रशीद खानने अखेरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मुश्‍फिकुर रहीमला बाद करून बांगला देशला पहिला हादरा दिला. पुढच्या चार चेंडूंवर महमुदुल्लाह व अरिफुल हक यांनी अनुक्रमने 1, 2, 1 व 1 धावा काढल्या. अखेरच्या चेंडूवर आरिफुलने लगावलेल्या फटक्‍यावर शफिकुल्लाहने अफलातून क्षेत्ररक्षण करीत चेंडू यष्टीरक्षकाकडे फेकला. यष्टीरक्षक महंमद शेहझादने कोणतीही चूक न करता महमुदुल्लाहला धावबाद करीत अफगाणिस्तानला 1 धावेने विजयी केले.

त्याआधी नाणेफेक गमावून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानला महंमद शेहझाद आणि उस्मान घनी यांनी 7.4 षटकांत 55 धावांची सलामी दिली. शेहझादने 22 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकारासह 26 धावा फटकावल्या. तर उस्मान घनीने 1 चौकार व 1 षटकारासह 19 धावा करीत त्याला साथ दिली. हे दोघे लागोपाठ तंबूत परतल्यावर समिउल्लाह शेनवारीने 28 चेंडूंत 1 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 33 धावा करताना असगर स्तानिकझाईच्या साथीत तिसऱ्या विकेटसाठी 36 धावांचीकेली.

तसेच नजिबुल्लाह झादरानच्या साथीत पाचव्या विकेटसाठी 34 धावांची भागीदारी करीत शेनवारीने अफगाणिस्तानला 145 धावांची मजल मारून दिली. असगर स्तानिकझाईने केवळ 17 चेंडूंत 3 षटकारांसह 27 धावा फटकावल्या. बांगला देशकडून नझमुल इस्लामने 18 धावांत 2, तर अबू झायेदने 27 धावांत 2 बळी घेत सर्वोत्तम कामगिरी केली. शकिब अल हसन आणि अरिफुल हक यांनी प्रत्येकी एक बळी घेत त्यांना साथ दिली.

संक्षिप्त धावफलक – 
अफगाणिस्तान- 20 षटकांत 6 बाद 145 (समिउल्लाह शेनवारी नाबाद 33, असगर स्तानिकझाई 27, महंमद शेहझाद 26, उस्मान घनी 19, नजिबुल्लाह झादरान 15, नझमुल इस्लाम 18-2, अबू झायेद 27-2, शकिब अल हसन 16-1, अरिफुल हक 13-1) वि.वि. बांगला देश- 20 षटकांत 6 बाद 144 (मुश्‍फिकुर रहीम 46, महमुदुल्लाह 45, सौम्य सरकार 15, लिट्टन दास 12, रशीद खान 24-1, मुजीब उर रेहमान 25-1, करीम जानत 44-1).

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button