माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर आज लोधी स्मशान घाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना 10 ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या डोक्यातील रक्ताच्या गाठी काढण्यासाठी शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. ते व्हेंटीलेटरवर होते. तत्पूर्वी, 10 राजाजी मार्ग येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली अर्पण केली. केंद्र सरकार ने त्यांच्या सन्मानार्थ 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरपर्यंत सात दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. यानंतर पश्चिम बंगाल सरकारनेही दुखवटा जाहीर केला आहे. सोमवारी प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पीएम मोदी, अमित शाह, लालकृष्ण आडवाणी आणि राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला. दरम्यान प्रणव मुखर्जी यांना कोरोना संसर्गदेखील झाला होता. यामुळे एसओपीअंतर्गत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे पुत्र अभिजीत बॅनर्जी आणि कुटुंबातील सदस्यदेखील पीपीई किट घालून उपस्थित होते.





