मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळमध्ये अदाणी समूहाची ७४ टक्के हिस्सेदारी
मुंबई – देशातल्या सर्वांत मोठ्या विमानतळांपैकी एक असणाऱ्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची 74 टक्के हिस्सेदारीं अदानी उद्योग समूहाने खरेदी केली आहे. याबाबतची करार प्रक्रिया पूर्ण झाल्याने देशातील खासगी क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकाचा ‘एअरपोर्ट ऑपरेटर’ असल्याचा बहुमान अदाणी उद्योग समूहाच्या नावे झाला आहे.
मुंबई विमानतळमधील जीव्हीके एअरपोर्ट होल्डिंगची हिस्सेदारी खरेदी करण्याचा करार झाला असल्याचा माहिती उद्योगपती गौतम अदाणी यांनी दिली आहे. जीव्हीके एअरपोर्ट होल्डिंगकडे ५०.५ टक्के भागभांडवल होते. सध्या बिडवेस्ट या दक्षिण आफ्रिकन कंपनीकडे १३.५ टक्के तर दक्षिण आफ्रिकेच्याच एसीएसए या कंपनीकडे १० टक्के भागभांडवल आहे.
मुंबई विमानतळातील हिस्सा खरेदी केल्यानंतर देशातील ६ विमानतळे अदानी समुहाकडे असणार आहे. मुंबई विमानतळाच्या अधिग्रहणानंतर अदानी समुहाला नवी मुंबईत उभारल्या जात असलेल्या विमानतळाचेही कंत्राट दिले जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. सध्या दिल्ली, हैदराबाद अशा विमानतळांच्या देखरेखीचे आणि हाताळणीचे काम करणारे जीएमआर समुह देशातील मोठे ‘प्रायव्हेट एअरपोर्ट ऑपरेटर’ आहे.