पाक सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळले
इस्लामाबाद – पाकिस्तानी लष्कराचे हेलिकॉप्टर आज बलुचिस्तान प्रांतात कोसळले. त्यामध्ये एक सैनिक मरण पावला तर अन्य दोघेजण जखमी झाले. हे हेलिकॉप्टर जखमी सैनिकाला बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टामधील कोल्हू भागात घेऊन चालले होते. याच वेळी हेलिकॉप्टरला इमर्जन्सी लॅन्डिंग करावे लागले. मात्र ते सुखरूपपणे जमिनीवर उतरू शकले नाही. हेलिकॉप्टरमधील एक सैनिक मरण पावला तर दोघेजन जखमी झाले. हेलिकॉप्टरचे दोन वैमानिक मात्र सुखरूप बचावले आहेत, असे पाक लष्कराच्या प्रसिद्धी निवेदनामध्ये म्हटले आहे.
पाकिस्तान लष्कराच्या हवाई सेवेमध्ये अशाप्रकारचे अपघात नियमितपणे होत असतात. गेल्या महिन्यात लाहोरमध्ये एक प्रशिक्षणार्थी विमान कोसळून दोन वैमानिक जखमी झाले होते. तर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तान हवाई दलाचे मिराज विमान कराचीतील मुशर्रफ कॉलनीजवळ कोसळून वैमानिक मरण पावला होता.
2016 च्या सप्टेंबर महिन्यात एफ-7 लढाऊ विमान जमरुड येथे कोसळून फ्लाईट लेफ्टनंट पदावरचा अधिकारी मरण पावला होता. पाकिस्तानमधील लढाऊ विमानाच्या फारच कमी पायलट महिलांपैकी मरियम मौख्तियार ही नोव्हेंबर 2015 मध्ये अशाच अपघातात मरण पावली होती.