पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कासारवाडीत कोविड बाधितांच्या संख्येत वाढ – आशा शेंडगे
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
कोरोनाच्या टेस्ट शिघ्रपणे होत नसल्यामुळे कासारवाडीत कोरोना विषाणुचा फैलाव वेगाने होत आहे. एखाद्या कुटुंबातील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यास त्याची टेस्ट केल्यानंतर सहा दिवसांनी रिपोर्ट दिला जात आहे. तोपर्यंत त्याच्या कुटुंबातील अन्य सदस्य देखील पॉझिटिव्ह होत आहेत. कासारवाडीत रुग्णांची रॅपिट टेस्ट होणे गरजेचे आहे, अशी मागणी नगरसेविका आशा शेंडगे यांनी केली आहे.
कासारवाडीत 10 ते 15 कुटुंबांमधील काही सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आहेत. परंतु, त्यांचे रिपोर्ट पाच ते सहा दिवसांनी उशिरा प्राप्त झाले. ही दुर्दैवी बाब आहे. लोकांनाही ते पॉझिटिव्ह असल्याचे माहिती नसते. त्यामुळे कोरोना विषाणू एकापासून दुस-यापर्यंत पसरत आहे. टेस्ट केल्यानंतर जर रिपोर्ट पाच ते सहा दिवसांनी उशिरा आल्यामुळे या विषाणुवर नियंत्रण मिळविण्यात आपल्याला अपयश येणार असल्याची बाब आशा शेंडगे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या निदर्शनास आणून दिला. परंतु, याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे शेंडगे यांनी म्हटले आहे.
ज्या नागरिकांना कोविड 19 विषाणुची लक्षणे आढळली आहेत. ज्यांनी स्वॅब टेस्टिंगसाठी दिले आहेत. त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घ्यावे. असे केले तर किमान या विषाणुला पसरायला वाव मिळणार नाही. परिणामी, ज्यांना विषाणुची बाधा नाही, त्यांना सुरक्षित ठेवण्यास सहकार्य होईल, असे आवाहन शेंडगे यांनी प्रभागातील नागरिकांना केले आहे.