पंढरीत सामाजिक ऐक्याचे दर्शन, हिंदू-मुस्लिम बांधवांनी केली श्रीरामाची आरती
अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आज प्रभू श्रीरामाच्या मंदिराचे भूमिपूजन झाले. यानिमित्ताने देशभरात जणू दिवाळी साजरी झाली. तसेच शहर, गावात मंदिरात आरती करून, फटाके उडवून, मिठाई वाटून या शुभ दिनाचा जल्लोष साजरा करण्यात आला. पंढरीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अडीचशे वर्षांपूर्वी उभारलेल्या श्रीराम मंदिरामध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन श्रीरामाचे पूजन आणि आरती करुन सामाजिक ऐक्याचे अनोखे दर्शन घडविले.
अयोध्येत श्रीराम मंदिराचा भूमिपूजन सोहळा सुरु असताना पंढरपूर मधील होळकर मठात हा सोहळा सुरु होता. आरती झाल्यानंतर सर्व उपस्थितानी “जय श्रीराम” असा एकच नारा दिला. यावेळी सर्व मुस्लिम बांधवांचा होळकर संस्थाच्या वतीने व्यवस्थापक फत्तेपुरकर यांनी सत्कार केला. प्रसंगी फिजिकल डिस्टन्सचे पालन करण्यात आले.
या पूजन सोहळ्यात माजी नगराध्यक्ष नागेश भोसले, नगरसेवक इब्राहिम बोहरी, नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर, अशपाक सय्यद, इब्राहिम बोहरी, इक्बाल बागवान, समीर बेंद्रेकर, अकबर शेख, दिलीप धोत्रे, ह.भ.प. राजेंद्र महाराज मोरे, शाम गोगांव, चंदूकाका दंडवते, गिरीष बोरखेडकर, माधव ताठे-देशमुख, विजय बंटी वाघ असे मोठ्या संख्येने दोन्ही समाजातील मान्यवर उपस्थित होते.