‘सोशल डिस्टन्सिंग’ न पाळणा-यांवर आता माजी सैनिकांचा वॉच
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मास्क न वापरणाऱ्यांवर आणि रस्त्यावर थुकणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. आता सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवरही कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी पालिका प्रशासन माजी सैनिकांचे विशेष पथक नेमणार आहे.
नाक व तोंडावर योग्य पद्धतीने मास्क लावल्यास कोरोना विषाणूचा प्रसार होत नाही. त्यामुळे पालिकेने मास्क लावणे नागरिकांना बंधनकारक केले आहे. मास्क नसणाऱ्यांना ५०० रूपये दंड केला जात आहे. ही कारवाई १ एप्रिलपासून सुरू करण्यात आली आहे. ३१ जुलैपर्यंत ४ महिन्यांत एकूण २ हजार ८५० जणांना कारवाई करीत एकूण १४ लाख २५ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर कारवाईसाठी आता माजी सैनिकांचे विशेष पथक नियुक्त केले जाणार आहे, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. नागरिकांनी घराबाहेर पडल्यास तोंडावर योग्यरितीने मास्क लावावा. घरात अधिक सदस्य असतील तर, सर्वांनी मास्क वापरणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.