केंद्र सरकारकडून लॉकडाऊनमध्ये आणखीन थोडी सूट
केंद्राकडून आरोग्य विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी परवानगी देण्याचे तसंच पायी निघालेल्या श्रमिकांना थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोरोनाचा वाढता फैलाव पाहता काही कालावधीसाठी लॉकडाऊन वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे… यावर केंद्र सरकारनं लॉकडाऊनमध्ये आणखीन थोडी सूट दिली आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी मजुरांच्या स्थलांतरासंबंधी राज्यांना एक पत्र धाडलंय. यासोबतच मेडिकल सेवांसंबंधित क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय येण्या-जाण्याची परवानगी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व राज्यांना श्रमिक विशेष रेल्वेनं राज्यात परतणाऱ्या मजुरांना आणि श्रमिकांना पाठवण्यासाठी आणि परत बोलावण्यासाठी मदत करण्याचेही निर्देश या पत्रातून देण्यात आले आहेत.
रस्ते आणि रेल्वे मार्गावरून पायी चालत निघालेल्या प्रवाशांना ताबडतोब थांबवा. अशा लोकांसाठी शेल्टर होमची व्यवस्था करण्याचंही या पत्रातून निर्देश देण्यात आलेत.