अण्णा हजारे म्हणाले ; दारुची दुकाने सुरू करणे म्हणजे ‘विनाशकाले विपरित बुद्धी’

अहमदनगर | सध्या जगभर कोरोनाने थैमान घातले आहे. जगातील 37 लाखाहून अधिक लोक या साथीने बाधित झालेले आहेत तर अडीच लाखाहून अधिक लोक मृत्यु पावले आहेत. भारतातील स्थितीही याला अपवाद नाही. दिवसेंदिवस भारतातही कोरोनाचा संसर्ग वाढत असून दुर्दैवाने त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. सरकार आणि प्रशासन वारंवार सांगत आहेत की, कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी आपल्या घरात रहा, कोणत्याही परिस्थितीत बाहेर पडू नका. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, मास्क वापरा. त्यासाठी सरकारने तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू केले आहे. लॉकडाऊनमुळे दाट लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात कोरोनाला बऱ्यापैकी प्रतिबंध करण्यात आल्याचेही दिसत आहे. कोरोनाविरुद्धचा लढा किती दिवस चालेल सांगता येणार नाही. तसेच संपूर्ण जग वेठीस धरणाऱ्या कोरोनाच्या संकटाचा कसा शेवट होणार आहे हेही कुणालाच सांगता येणार नाही.
मात्र, एक गोष्ट स्पष्ट आहे की, भारताकडे लोकसंख्येच्या तुलनेत वैद्यकीय सुविधा व साधनसामग्री अत्यंत तोकडी आहे. अशा वेळी साथीचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला तर परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही. म्हणून नंतरच्या उपचारापेक्षा अगोदरच प्रतिबंधात्मक उपाय करणे हे भारतासाठी फायदेशीर आहे. म्हणून लॉकडाऊन हा सर्वात योग्य पर्याय आहे. अत्यावश्यक व जीवन जगण्यासाठी महत्त्वाच्या बाबींशिवाय लोकांना घराबाहेर पडायला परवानगीच नको आहे. प्रशासन, कार्यकर्ते व स्वयंसेवी संस्थाकडून यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. डॉक्टर, नर्सेस, पोलीस हे सर्वजण आपला जीव धोक्यात घालून प्रयत्नांची शिकस्त करीत आहेत. पण दुर्दैवाने जनतेकडून जो प्रतिसाद मिळायला पाहिजे तेवढा मिळत नाही. अनेक लोक विनाकारण रस्त्यावर येताना दिसतात.
अशा परिस्थितीत शासनाने दारुची दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक कोरोनाच्या संकटाचे गांभिर्य पाहता, आज ज्या गोष्टी युद्ध पातलीवर महत्त्वाच्या आहेत, त्यात कोरोनाचा संसर्ग रोखणे, बोधित रुग्णांना वाचवणे आणि लॉकडाऊनच्या काळात उपासमार होत असलेल्या गरीब लोकांना रेशन व जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणे याचा प्राधान्याने समावेश होतो. अर्थातच दारुचा जीवनावश्यक बाबीत समावेश होत नाही. तरीही दारुची दुकाने सुरू करण्यात आली आणि या दुकानांसमोर पहाटेपासून प्रचंड रांगा लागल्याचे चित्र पहायला मिळाले. हे दुर्दैवी चित्र पाहून फार वाईट वाटले. आम्ही देशाला आणि पर्यायाने जनतेला कुठे घेऊन चाललोय हा प्रश्न निर्माण झाला. कोरोनाची भिती, तळपते ऊन याची आजिबात तमा न बाळगता दारूच्या दुकानांपुढे लागलेल्या रांगा पाहता लोक कोरोनाबद्दल आजिबात गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले.




