सोलापुरातून उस्मानाबादेत आलेला पोलीस कॉन्स्टेबल निघाला कोरोना पॉजिटीव्ह, जिल्हा संकटात
उस्मानाबाद | महाईन्यूज | प्रतिनिधी
सोलापूरहून उस्मानाबादच्या चिखली गावात आलेला एक पोलीस कॉन्स्टेबल कोरोना पॉजिटीव्ह निघाला असून, यामुळे ग्रीन झोनमध्ये असलेला उस्मानाबाद जिल्हा संकटात सापडला आहे. हा पोलीस कॉन्स्टेबल उस्मानाबाद जिल्ह्यात अनधिकृत आला होता, हे निष्पन्न झाले असून, नियमानुसार त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी सांगितले.
उस्मानाबाद तालुक्यातील चिखली गावातील एक पोलीस कॉन्स्टेबल सध्या सोलापूर पोलीस मुख्यालयात कार्यरत आहे. तो दि.२४ एप्रिल रोजी गावाकडे आला होता. सोलापुरात त्याची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर तो कोरोना पॉजिटीव्ह निघाला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात अनधिकृत आलेला हा पोलीस कॉन्स्टेबल कोरोना पॉजिटीव्ह निघाल्यानंतर चिखली गावात एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर कोरोना बाधित पोलीस कॉन्स्टेबलचे आई- वडील, भाऊ, भावाची पत्नी आदीना उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना वार्डात भरती करून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गलांडे यांनी सांगितले.
विशेष म्हणजे सदर पोलीस कॉन्स्टेबल सोलापुरात ज्या रूमवर राहतो तो रूममेटही कोरोना बाधित निघाला आहे. हा कॉन्स्टेबल जिल्हा प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता गावी आला होता, त्याला कुणाचा वरदहस्त आहे ? असा प्रश्न विचारला जात आहे.