टॉम अँड जेरी आणि पॉपोय कार्टून तयार करणारे दिग्दर्शक जीन डायच यांचं वृद्धापकाळाने निधन
८० आणि ९० च्या दशकात टॉम अँड जेरी आणि पॉपोय या प्रसिद्ध कार्टूनने छोट्या मुलांना अक्षरशः वेड लावलं होतं. कार्टुनच्या इतिहासात या दोन कार्टून कॅरेक्टरचा उल्लेख नक्कीच होईल यात काही शंका नाही. आजही हे कार्टून तितकच लोकप्रिय आहे..मात्र हे कॅरेक्टर आणि हे कार्टून तयार करणाऱ्यांपैकी अॅनेमिटर आणि दिग्दर्शक जीन डायच यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. प्रागमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
१९६० मध्ये त्यांना ‘मुनरो’ या अॅनिमेटेड लघुपटासाठी ऑस्कर पुरस्कारही मिळाला होता. अॅनिमेशन क्षेत्रातील दिग्गजांमध्ये जीन डायच यांचं नाव आवर्जुन घेतलं जातं. फक्त मुनरोच नाही तर त्यानंतरही दोनवेळा ऑस्करसाठी त्यांचं नामांकन झालं होतं.
१९२४ मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे जन्मलेले जीन डायच १९५९ मध्ये झेक रिपब्लिकमधील प्राग येथे जाऊन स्थायिक झाले. टॉम अँड जेरी आणि पॉपोय या दोन प्रसिद्ध कार्टून कॅरेक्टरशिवाय त्यांनी टॉम टेरिफिक सीरीज आणि सिडनीज फॅमिली ट्रीही तयार केले.