# War Against Coroana : चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ १८ हजार अन्न पाकिटांचे वाटप

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
दररोज २० हजार चपात्या, २०० किलो डाळीचे वरण आणि ४०० किलो भात आणि भाजी देऊन पिंपळेगुरव येथील चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ९ हजार बेघर, बाहेरगावचे विद्यार्थी, तृतीयपंथी, स्थलांतरित कामगार तसेच हातावर पोट असणाऱ्यांचा सांभाळ करत आहे. गेल्या २२ दिवसांपासून अखंडपणे दररोज दोन वेळच्या जेवणासाठी १८ हजार अन्न पाकिटांचे मोफत वितरण करण्यात येत आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मदतीने सुरू असलेली ही अन्नपूर्णा योजना लॉकडाऊनच्या काळात गरजूंना आपले पोट भरण्यासाठी मोठा आधार ठरली आहे. या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन जारी झाल्याने शिक्षणासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये आलेले बाहेरगावचे विद्यार्थी, बेघर नागरिक, स्थलांतरित कामगार, तृतीयपंथी आणि हातावर पोट असणाऱ्यांसमोर आता पोटाची भूक कशी भागवायची हा मोठा प्रश्न निर्माण झाला.
या सर्वांच्या मदतीला पिंपळेगुरव येथील चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धावून गेला आहे. या दोघांच्या माध्यमातून दररोज शहरातील सुमारे ९ हजार नागरिकांना दोन वेळचे जेवण दिले जात आहे. माणुसकीच्या दृष्टीकोनातून गेल्या २२ दिवसांपासून हा उपक्रम निरंतर सुरू आहे. या ९ हजार नागरिकांना दररोज दोन वेळच्या जेवणात वरण भात, भाजी आणि दोन चपातीचा समावेश असलेली अन्न पाकिटे पुरविली जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर केला, त्याच दिवसांपासून चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गरजूंना जेवणाची पाकिटे वितरित करण्यास सुरूवात केली.
सुरूवातीला ४०० ते ५०० लोकांपर्यंत ही मदत पोहोचविली जात होती. आती ही संख्या वाढून दररोज तब्बल ९ हजार व्यक्ती एवढी झाली आहे. या व्यक्तींना दररोज दोनवेळचे जेवण पुरविण्यासाठी दररोज ३०० किलो आटा, २०० किलो डाळीचे वरण, ४०० किलो भात आणि भाजी बनविली जाते. तयार झालेले अन्न १८ हजार पाकिटांमध्ये पॅक करून ते गरजूपयंत पोहोचविले जाते. ९ हजार व्यक्तींचे जेवण बनविण्यासाठी भाजपच्या नगरसेविका उषा मुंढे व त्यांच्या बचत गटांतील २५ महिला गेल्या २२ दिवसांपासून स्वयंस्फूर्तीने काम करत आहेत.




