पाच दिवसाच्या बाळाची करोनावर मात
कस्तुरबा रुग्णालयात करोनावर उपचार घेत असलेल्या चेंबूर येथील एका पाच दिवसाच्या बाळाने करोनावर मात केली आहे. या नवजात बालकासह त्याच्या आईची करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र, त्यांना अद्याप डिस्चार्ज देण्यात आलेला नाही.
२६ मार्च रोजी चेंबूरच्या साई रुग्णालयात या महिलेला आणि तिच्या पाच दिवसाच्या बाळाला करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. तर या मुलाच्या वडिलांची चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यामुळे या दोघांनाही तातडीने कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आलं होतं. या दोघांवर कस्तुरबामध्ये उपचार सुरू असतानाच खबरदारीचा उपाय म्हणून मुलाच्या वडिलालाही कस्तुरबामध्ये क्वॉरंटाइन करण्यात आलं होतं. काल या तिघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज पुन्हा या तिघांची टेस्ट केली जाणार आहे. त्यांचा हा रिपोर्टही निगेटिव्ह आल्यास या तिघांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल, असं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं.