श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीकडून मुख्यमंत्री सहायता निधीला 1 कोटी रुपयांची मदत
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठयाप्रमाणात वाढला आहे. तसेच कोराना विरोधात लढण्यासाठी अनेक संस्था, कंपनी, तसेच कलाकार मंडळी तर देवस्थानं सुद्धा मदत करत आहेत..त्याचप्रमाणे आता श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीने मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
श्रीविठ्ठल रूक्मिणी मंदिर १७ ते ३१ मार्च या कालावधीत भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. ४ एप्रिल रोजी चैत्री यात्रा भरत असून, या यात्रेला अंदाजे ३ ते ४ लाख भाविक महाराष्ट्र व इतर राज्यातून येतात. केंद्र शासनाने १४ एप्रिलपर्यत संपूर्ण देशभरात लॉकडाऊन केला आहे. आंतरजिल्हा प्रवास करण्यास ही राज्य शासनाने बंदी घातली आहे, अशा पार्श्वभूमीवर एवढ्या मोठया प्रमाणावर पंढरपुरात भाविक आले तर, कोरोना व्हायरसचा मोठा संसर्ग होऊ शकतो. ही बाब विचारात घेवून मंदिर समितीने चैत्री यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या राज्य शासनाकडून नागरिकांसाठी विविध उपाय योजना व सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. अशा परिस्थितीत मानवतावादी भूमिकेतून व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मंदिर समितीने प्रशासनास मेडिकल किट उपलब्ध करून देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. पंढरपूर शहर-परिसरातील बेघर व निराधार नागरिकांसाठी फुड पॅकेट उपलब्ध करून देण्यात येत आहेत. राज्य शासनाला आर्थिक मदत करणे ही काळाची गरज आहे, ही बाब विचारात घेवून मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.