‘टिकटॉक’ स्टार किर्ती पटेल हिला खुनाच्या गुन्ह्यात अटक
गांधीनगर | महाईन्यूज | ऑनलाईन टीम
गुजरातमधील गाजलेली प्रसिध्द ‘टिकटॉक’ स्टार कीर्ती पटेल हिला पोलिसांनी अटक केली आहे. दोन गटांमध्ये किरकोळ कारणावरून खूनाचा प्रयत्न केल्याचा आरोप तिच्यावर आहे.
ही टिकटॉक स्टार किर्ती पटेल ही सुरतची रहिवासी आहे. ‘टिकटॉक’ व्हिडीओ तयार करुन सोशल मीडियावर अपलोड करते. त्यामुळे कीर्तीला संपूर्ण गुजरातमध्ये लोकप्रियता मिळाली. एका व्हिडीओमध्ये कीर्तीच्या मैत्रिणीने भरवाड समाजाला उद्देशून अपशब्द वापरला होता. यामुळे संतप्त समाजासोबत तिची वादावादी झाली. त्यावर कीर्ती पटेल आणि भरवाड समाजातील व्यक्तींकडून एकमेकांना मारहाणीच्या धमक्या देण्यात आल्या.
विशेष म्हणजे ‘टिकटॉक’वर दोन्ही गटांमध्ये चढाओढ रंगली. अखेर, वादावर तोडगा काढण्यासाठी कीर्तीने तिच्या साथीदारांसह भरवाड समाजासोबत बैठक घेतली. मात्र, त्याचवेळी दोन्ही गटात मारहाण सुरु झाली. कीर्ती पटेलच्या बाजूने असलेल्या कनू भरवाडे याने रघू भरवाडच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. गंभीर जखमी झालेल्या रघूने पूनागाम पोलिसात कीर्ती आणि तिच्या साथीदारांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी टिकटॉक स्टार कीर्ती पटेल आणि तिच्या साथीदारांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. कीर्तीसह तिच्या मैत्रिणीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.