महापौर चषक क्रीडा स्पर्धेचा रविवारी शानदार समारोप
रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, पदक व प्रमाणपत्र देऊन बक्षीस वितरण
पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी
महापौर चषक ‘टिन 20’ आंतरशालेय क्रीडा स्पर्धेचे शानदार समारोप व बक्षीस वितरण सोहळा रविवारी (दि.2) म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल येथे होणार आहे. कार्यक्रमात विजेता व उपविजेता संघांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, पदक व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे व उपमहापौर तथा क्रीडा समितीचे सभापती तुषार हिंगे यांनी दिली.
महापौर दालनात झालेल्या पत्रकार परिषदेला नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, क्रीडाधिकारी रज्जाक पानसरे व अधिकारी उपस्थित होते. महापौर उषा ढोरे व उपमहापौर तुषार हिंगे यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महापालिका व खासगी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी महापौर चषक ‘टिन 20’ क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत फुटबॉल, कबड्डी, खो-खो, अॅथलेटिक्स, बुद्धीबळ, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, जलतरण, स्केटींग, हॉकी, कुस्ती, थ्रोबॉल, योगा, क्रिकेट, बास्केटबॉल, हॅण्डबॉल, कराटे, मुष्टियुद्ध, किकबॉक्सिंग, तायक्वांदो या 20 खेळाचे आयोजन केले होते. स्पर्धेत तब्बल 19 हजार 86 विद्यार्थी-खेळाडूंनी सहभाग घेतला.
स्पर्धा शहरातील विविध 23 ठिकाणी आयोजित करण्यात आल्या. स्पर्धेत खेळाडूंनी हिरेरीने सहभाग घेतला. या स्पर्धाचा समारोप व बक्षीस वितरण शिव छत्रपती क्रीडा संकुल येथे होणार आहे. या निमित्त सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिका शाळेचे तब्बल 5 हजार विद्यार्थी समुहगीत सादर करणार आहेत. त्यानंतर फायर शो होणार आहे. तसेच, विमानांची व मल्लखांबाची प्रात्याक्षिके आहेत. शेवटी लोकनृत्याचा भारदार सांस्कृतिक कार्यक्रम आहे.
बक्षीस वितरण कार्यक्रम महापौर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार आहेत. तसेच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, आमदार लक्ष्मण जगताप, आ. महेश लांडगे, खासदार अमर साबळे आणि पालिकेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.