पुण्यात बारमध्ये बिल देण्यावरून कामगार आणि ग्राहकांत वाद, बाऊन्सरने केला गोळीबार
पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी
मद्यपान आणि जेवण केल्यानंतर बारमध्ये बील देण्यावरून कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये जाेरदार वाद झाला. वाद टोकाला गेल्याने मध्यस्ती करण्यासाठी आलेल्या बाऊन्सरने हवेत गोळीबार केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी ग्राहक आणि बाऊन्सरसह 13 जणांविरुध्द गुन्हा नोंदविला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या मंगळवार पेठेत वसंत बारमध्ये सोमवारी रात्री अक्षय काळोखे, संतोष बोराटे आणि सागर आगलावे तिघेजण मद्यपान आणि जेवण करत होते. जेवन झाल्यानंतर बिलावरून या तिघांचा बारमधील कर्मचाऱ्याशी वाद झाला. हे तिघेही मद्यपान आणि जेवणाचं बिल देत नसल्याने हा वाद वाढत गेला.
दरम्यान, या वादाचे रुपांतर बाचाबाचीत झाले. मध्यस्थीसाठी आलेला बाउन्सर महिमाशंकर तिवारी याने थेट पिस्तूल काढून हवेत गोळीबार केला. वसंत बार हा सदानंद शेट्टी या राजकीय नेत्याच्या मालकीचा आहे. नुकताच त्यांनी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात ग्राहक आणि गोळीबार करणाऱ्या बाउन्सरसह तेरा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.