सहलीसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या बसला अपघात, 15 विद्यार्थी आणि 3 शिक्षक जखमी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
तळेगाव खिंडीत जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर आज बुधवारी (दि. 25) पहाटे चारच्या सुमारास शालेय विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन जाणाऱ्या एसटी बसची उसाच्या ट्रॉलीला धडक बसली. या अपघातात 45 विद्यार्थ्यांपैकी 15 विद्यार्थी आणि तीन शिक्षक जखमी झाले. ही एसटी मुंबईहून संगमनेरकडे निघाली होती. या अपघातातील जखमींवर पवना रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खताळ महाविद्यालयातून या विद्यार्थ्यांची अलिबागला सहल गेली होती. सहलीहून विद्यार्थ्यांची बस परत संगमनेरला जाण्यासाठी निघाली होती. दरम्यान, मुंबई-पुणे महामार्गावर मधोमध बंद पडलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली उभी होती. बसचालकाला अंधारात ही ट्रॉली न दिसल्यामुळे एसटी बसची ट्रॉलीला धडक बसली. या दुर्घटनेनंतर उसाच्या मोळ्या महामार्गावर पडल्या तर एसटीही बंद पडल्यानं काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली.
पोलिसांनी पर्यायी मार्ग म्हणून मुंबईकडे जाणाऱ्या एक लेनवरून विरुद्ध दिशेने वाहतूक वळविण्यात आली होती. मुंबई-पुणे महामार्गावर सतत होणाऱ्या अपघातांमुळे धोकादायक बनत चालला आहे.





