चंद्रपूरच्या अपक्ष आमदाराचा यू-टर्न
चंद्रपूर | अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरच्या विकासासाठी भाजपला अर्थात महायुतीला पाठिंबा दिला होता. पण राज्यात गेल्या महिनाभराच्या राजकीय घडामोडीनंतर महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले. यानंतर जोरगेवार यांनी यू-टर्न घेत थेट विधानसभेत महाविकासआघाडीला पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. मात्र जोरगेवार यांनी चंद्रपूरच्या विकासाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मदत करणार असल्याने त्यांना पाठिंबा दिला असल्याचे स्पष्ट केले.
“चंद्रपूरच्या विकासाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मदत करणार आहेत. तसेच चंद्रपूरचे मुद्दे मार्गी लावण्यासाठी महाविकासआघाडीला पाठिंबा दिला. येत्या काळात शेतजमीन पट्ट्यांचा प्रश्न-प्रदूषण-रोजगार-पेयजल या सर्वच मुद्द्यांवर शिवसेनाप्रणीत सरकार मदत करणार”, असं आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले.